पंच्याऐंशी कवितांचं हे एक छोटेखानी पुस्तक असलं तरी, हा असंख्य अक्षरे व अर्थपूर्ण शब्दांनी ओतप्रोत भरलेला काव्यमय “अक्षर कुंभ” आहे. समाज, संस्कृती, निसर्ग, प्रेम, भक्ती, शिव, राज्य, राष्ट्र व भाषाप्रेम याविषयीचे जाज्वल्य विचार या कुंभातून अवतरलेले दिसून येतील. गाव, राज्य व देशातील अनेक प्रश्नांना फोडलेली वाचा व त्या प्रश्नांची उत्तरे धुंडाळण्याचा मार्गही या पुस्तकातून सापडू शकेल. अवतीभवतीच्या वास्तवातील बोचऱ्या गोष्टीवरचं उत्तम भाष्यही,हे पुस्तक करतं.
नुसती सामाजिक तगमगच नाही तर, त्या साऱ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठीचं तंत्रही वाचकांना याद्वारे सापडेल, असं वाटतं. समाज उद्धारासाठी असलेली कळकळ,चांगल्या निर्मितीसाठीची धडपड आणि एक उदात्त संस्कृती जपण्यासाठीची तळमळ, याचे मनोज्ञ दर्शन,हे पुस्तक घडवू शकते. एका संवेदनशील कवीने आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या वेदनादायी गोष्टींवर भाष्य करीत आणि प्रेमाचे, निसर्गाचे विभ्रम दाखवत आपल्या मनाचे कवितेचे भरलेले पठार या अक्षरकुंभातून रसिकांना दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
त्यामुळे हा “अक्षरकुंभ” वाचकांच्या मनातील कवितेचे आभाळ नक्कीच उजळ करेल असा विश्वास आहे.
‘अक्षरकुंभ’ या नव्या काव्य-संग्रहातून कवी डॉ. मारुती नलावडे पुन्हा एकदा व्यक्त होत आहेत. ‘अक्षरझेप’ ह्या त्यांच्या यापूर्वीच्या कवितासंग्रहास पुरस्कार लाभले व जाणकार वाचकांनी त्या काव्यसंग्रहाचे मनापासून स्वागतही केले. ह्या नव्या काव्यसंग्रहातील सर्वच कविता डॉ. नलावडे ह्यांच्या संवेदनशीलतेची ग्वाही देतात. चित्ताला विलक्षण मोद देणाऱ्या या कवितांचे रसग्रहण करणे, ही वाचकांसाठी आनंददायी गोष्ट ठरेल. त्यांच्या कवितांमध्ये एक सहजता आहे. असे सोप्या शब्दांत लिहिणे, हे फार थोड्या कवींनाच जमते. या कविता जणू कवीच्या निवेदनालाच सोबत घेऊन येतात. या कवितांना चिंतनाची स्वतंत्र डूब असल्याने त्या जणू अक्षरांच्या आनंदकुंभातून अवतरल्या आहेत.






Reviews
There are no reviews yet.