एका स्त्रीची आई होण्याची इच्छा है मनुष्य जातीला मिळालेलं वरदानच, बाळाला आपल्या उदरात वाढवून जन्म देणं हे संपूर्ण मातृत्व नसलं तरी एक महत्त्वाची घटना नक्कीच आहे. बदलणाऱ्या जीवनमानाचा स्त्रीच्या शरीरावर जो परिणाम झाला त्याने तिच्या आई होण्याच्या इच्छेच्या मार्गात अनेक अडथळे निर्माण झाले. आयव्हिएफ, आयओयु सारखे तंत्रज्ञान विज्ञानाची देणगी ठरले. पण प्रत्येक देणगीची काही किंमत मोजावी लागते.
‘एन ५ ही केवळ एका स्त्रीची गोष्ट नसून समाजाच्या तिच्याकडून असण्याऱ्या अपेक्षा, नात्यांमधले भावनिक बंध, तंत्रज्ञानाविषयी असलेलं अज्ञान यांचं चित्र रेखाटत, वैद्यकीय क्षेत्राचे चांगले वाईट अनुभव त्या क्षेत्राचा मान राखून मांडले आहेत. ही गोष्ट सांगताना, प्रकर्षाने जी गोष्ट जाणवली, ती ही की समाजाला अशा व्यवस्थांची गरज आहे जी समाजाचं वैद्यकीय, आर्थिक आणि कायदेशीर निरपेक्ष मार्गदर्शन करेल.
केवळ अनुभवकथन या एका उद्देशाने ही गोष्ट सांगितली आहे. अनुभव सांगताना कुठल्या तरी गोष्टीला वाचा फोडतोय किंवा बदल घडवतोय असा कुठलाही गैरसमज मनात नाही. फार फार तर आयव्हिएफचा विचार करताना एखादं दांपत्य हा अनुभव वाचून आपल्या परिने तयारी करू शकतं.
या गोष्टीतला प्रत्येक पैलू नवरसांचं दर्शन घडवतो, माणूस नावाच्या विचित्र प्राण्याची विविध रूपं दाखवतो.





